Print

श्री समर्थ विद्यालयात आज गांधी जयंतीनिमित्य मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.शाळेचे विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छताअभियानात उत्साहाने सहभागी झाले होते. सकाळी आठ वाजता श्री समर्थ विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा देशाचे दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री या दोन्ही राष्ट्रनिर्मात्यांच्या जयंतीनिमित्य त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.यानंतर मुख्याध्यापिका सौ. माधवी मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक समितीचे प्रमुख श्री वटक यांनी केलेल्या नियोजनानुसार सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शाळेतील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडांगणे, शालेय परिसर,मध्यान्ह भोजन स्वयंपाकगृह इत्यादी परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर यांच्यासह पर्यवेक्षिका सौ. आरती काळे ह्यासुद्धा स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या होत्या. संपुर्ण परिसर स्वच्छ झाल्यानंतरच अभियान थांबविण्यात आले. विद्यार्थ्यांना श्रमपरिहार म्हणून अल्पोपहार देण्यात आला. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा स्वच्छताअभियानात सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका सौ. मंगरूळकर यांचे प्रोत्साहन व विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. दिवंगत वंदनीय नेत्यांना पुन्हा एकवार अभिवादन केल्यानंतर अभियानाची सांगता करण्यात आली.