Print

श्री समर्थ विद्यालय रंगले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी तिरंगी रंगात.

अमरावती १६ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत अमरावती शहरातील अग्रगण्य असणाऱ्या श्री समर्थ विद्यालयात विविध उपक्रमांसह शालेय इमारतीवर तिरंगी विद्युत रोषणाईसह ७५ तिरंगे ध्वज लावून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . श्री समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॅा. श्री. विनोद कोलवाडकर , उपाध्यक्ष प्रा.श्री. मोहन पुरोहीत, सचिव डॅा.श्री देवदत्त बोधनकर, सदस्य श्री. रमेशराव डांगे, डॅा. श्री. सुरेशराव देशपांडे, श्री. संदिप गोडबोले यांच्या मार्गदर्शनात व मुख्याध्यापक श्री धनंजय पाठक, उपमुख्याध्यापक श्री सचिन देवळे , पर्यवेक्षकव्दय श्री. पंकज देशपांडे व सौ. संगीता माथने यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबविले यांत रांगोळी स्पर्धा , राखी तयार करणे , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्वस्पर्धा , गीत गायन आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी शिक्षकांनी सुद्धा देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाला उंची प्रदान करत पालकांचीही दाद मिळवली. तर कार्यक्रम पश्चात ' सेल्फी कॅार्नरस' सारखी युवावर्गाला भूरळ घालणारी सुविधा उपलब्ध करून त्या माध्यमातूनही राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या संदेशाला घराघरात पोहचविले.शिवाय ' घर घर तिरंगा , हर घर तिरंगा ' या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व १७०० विद्यार्थांच्या घरांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या घरावरही तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
श्री समर्थ विद्यालयाच्या इमारतीवरील विद्युत रोषणाई ही अमरावती शहरातील शैक्षणिक क्षेत्रासह शहरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरली. या उपक्रमात शाळेतील सर्वच घटक आकंठ आनंदाने न्हाऊन निघाले होते.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शाळेच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.