Print

.समर्थ विद्यालयात शिक्षक दिन संपन्न.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त  '  शिक्षक दिन '  कार्यक्रम श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात पण  कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
शालेय प्रशासन तथा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय पाठक कार्यक्रमाच्या होते तर उपमुख्याध्यापक श्री. सचिन देवळे, पर्यवेक्षक श्री. पंकज देशपांडे, पर्यवेक्षक श्री.छगन आठवले ,मुख्य लिपिक श्री.मुकुंद पांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री काशिनाथ आखरे व्यासपीठावर विराजमान होते. मान्यवरांच्या हस्ते श्री. माता सरस्वती , समर्थ रामदास स्वामी व सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त ज्ञानदानाचे अविरतपणे काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन यथायोग्य सन्मान करण्यात आला. श्री.मुकूंद पांडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व सांगून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. श्री. राजेंद्र राऊत यांनी जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारे भगवान श्रीकृष्ण हे एक शिक्षकच होते असे सांगून शिक्षकाच्या पदाचा सन्मान केला.श्री. सचिन देवळे यांनी मोजक्या शब्दात गुरु व शिक्षक यातील फरक सांगितला. पर्यवेक्षक श्री. पंकज देशपांडे व श्री.छगन आठवले यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री.धनंजय पाठक यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे अधिकार व कर्तव्य यावर प्रकाश टाकत शिक्षक हा सृजनाचा निर्माता असतो त्याने स्वत:ला दीन मुळीच समजू नये व स्वत:चा आत्मविश्वासही हरवू नये असे विदित करून सर्वांना  शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना संकटाच्या काळात शाळेत विद्यार्थी नसताना समर्थ परिवारातील पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शिक्षकांच्या सन्मानार्थ स्वतः या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हा एक आगळा वेगळा कार्यक्रम समर्थ सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुंदर साहित्यिक मूल्य असणारे संचालन व आभार प्रदर्शन शाळेचे कार्यालयीन लिपिक श्री मिलिंद देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.